सातारा: सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीतील पुणे थांब्याजवळ आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार (ता.19) मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये मयत झालेले वारकरी हे हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे रहिवासी होते. त्यांचे नाव मायप्पा कोंडिबा माने (वय 45) असे आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या श्री. भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत जात होती. यातील काही वारकरी हे ट्रँक्टर- ट्राँलीमधून प्रवास करीत होते. यावेळी सदरील ट्रँक्टरला दोन ट्राँल्या जोडलेल्या होत्या. यामध्ये महिलांसह 43 वारकरी होते. दरम्यान,ट्रँक्टर ट्राँली सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत आली असता भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पोने धडक दिली.
हेही वाचा- स्वाभिमानीचा बिल्ला राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधला का!
धडक इतकी जोरात होते की काही क्षणात ट्रँक्टर ट्राँली पलटी झाली. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वारकऱ्यांच्या ट्रँक्टर ट्राँलीला जोरदार धडक दिली असल्याचे समजले आहे. या अपघातात ट्राॅलीमधील लोखंडी बार मायप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी वारकऱ्यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र मायप्पा माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
हेही वाचा- Kolhapur: जमा बीलांच्या वसूलीसाठी ४ लाखांचा खर्च
या अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, शिरवळ पोलीस स्टेशनच्या व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेनंतर वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती. आता वाहतूक सुरळीत सुरु आहे.
शिरवळ जवळील अपघातात कोल्हापूरचा एक वारकरी ठार; 30 जखमी
Advertisements