केळघर /वार्ताहर
केळघर घाटात आज (गुरुवार ) पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक काही तास ठप्प झाली. वाहन चालकांनी रस्त्यांवरील दगडधोंडे स्थानिकांच्या मदतीने दूर करत रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. तर रोडवेज सोल्युशनची यंत्रणा पोहचल्यानंतर रस्त्यावर पडलेली दरड बाजूला करत वाहतूक पूर्णतः सुरळीत करण्यात आली.
जावली तालुक्यातील सातारा – महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाट परिसरात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून यामुळे घाटात वारंवार दरडी कोसळत आहेत. आज (गुरुवार) पहाटे पुन्हा काळ्याकड्याच्या वरील बाजूस अरुंद रस्ता असलेल्या ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे महाबळेश्वरकडे ये – जा करणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यावेळी रस्त्याचे काम करणाऱ्या रोडवेज कंपनीला याची माहिती देण्यात आली. तर स्थानिक नागरिकांनी व इतर वाहन चालक व ग्रामस्थाच्या मदतीने रस्त्यावरील दगड – धोंडे बाजूला करण्यास सुरुवात केली. अन् थोड्याच वेळात रस्ता वाहतुकीस मोकळा केला. थोड्या वेळाने रोडवेज सोल्युशन कंपनीचे जेसीबी आले. त्यांनी उर्वरित रस्त्यावरील दगड – माती बाजूला करून रस्ता पूर्णतः . वाहतुकीसाठी मोकळा केला .