सातारा प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री सोम प्रकाश हे सध्या सातारा जिह्याच्या दौऱयावर आहेत. त्यांचे सर्व दिवसभराचे शेडय़ुल ठरलेले असताना त्यातूनच त्यांनी वेळ काढून साताऱ्यातील करंजे येथील भाजपाचे तरुण कार्यकर्ते विक्रम बोराटे यांच्या घरी रविवारी रात्री वांगे, मेथीची भाजी, चपाती असे साधे जेवण केले. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी साध्या पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्यांसाठी कार्य करण्याची उर्जा मिळाल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
राजकारणात कार्यकर्ता हा पक्षाचे कार्य करत असतो. नेते जे सांगतात त्याप्रमाणे तो पक्षाची धुरा वाहत असतो. मात्र, आपल्या घरी आपल्या पक्षाच्या नेत्याने भेट द्यावी, घरी यावे, आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे वाटत असते. असाच प्रत्यय भाजपाचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते विक्रम बोराटे यांना अनुभव आला. भाजपाचे केंद्रीय मंत्री सोम प्रकाश हे जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे मेळावे, बैठका, भेटीगाठी असे दिवसभर शेडय़ुल ठरलेले आहे. त्यांचा साताऱ्यात रविवारपासून त्यांचा मुक्काम हॉटेल फर्न येथे आहे. तेथून सायंकाळी करंज्याच्या दिशेने त्यांच्या वाहनांचा ताफा निघाला. तो ताफा अचानक भाजपाचे युवा कार्यकर्ते विक्रम बोराटे यांच्या निवासस्थानाबाहेर थांबला. बोराटे यांना अगोदर कल्पना असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी जेवणाची तयारी करुन ठेवली होती. अगदी साधे जेवण म्हणजे वांगे, मेथीची भाजी, चपाती असे. सायंकाळी वांगे आणि मेथीच्या भाजीचे जेवण केल्यानंतर एक वेगळाच आनंद विक्रम बोराटे यांना झाला. बोराटे यांनी गतवेळच्या 2016 च्या निवडणूकीत सातारा पालिकेची निवडणूक भाजपाच्या पॅनेलमधून लढवली होती. त्यांच्या घरी जेवण केल्यानंतर एक वेगळीच उर्जा त्यांच्यासह कार्यकर्त्यांना मिळाली.