प्रतिनिधी / खेड
सातारा जिह्यातील महाबळेश्वरनजीकच्या एका गावातील 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून पलायन केलेल्या 65 वर्षीय वृद्धास येथील पोलिसांनी अटक करून महाबळेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पुढे आली आहे. हा वृद्ध सध्या पुणे येथे वास्तव्यास असून तालुक्यातील धवडे गावातील रहिवाशी असल्याचे समजते. या वृद्धाचे नाव समजू शकले नाही.
10 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मेहुण्याच्या 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून या वृद्धाने पोबारा केला होता. त्यानुसार पोक्सोअंतर्गत महाबळेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा वृद्ध येथील बसस्थानक परिसरात वावरत असल्याची खात्रीशीर माहिती 112 क्रमांकाद्वारे येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी यांनी घटनास्थळी जाऊन वृद्धास तातडीने ताब्यात घेतले.