पाचगणी/प्रतिनिधी
सातारा शहर आज गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले. नटराज मंदिरासमोर एक अज्ञात व्यक्तीने भरदिवसा गोळीबार करत एकाच खून केला. वाई पोलिसांत ३०७ कलम दाखल असलेल्या व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या अर्जुन यादव याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा खून पूर्ववैमानस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोळीबारातील मृत अर्जुन यादव याच्यावर वाई पोलिसांत कलम ३०७ चा गुन्हा नोंद आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बॉम्बे रेस्टॉरंट नटराज मंदिरपरिसरात अर्जुन यादव याच्या डोक्यात गोळी घालत त्याचा खून केला. याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत मृताची ओळख पटवली. मृत यादव याचा खून पूर्व वैमानस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी भेट दिली असून मृत झालेला व्यक्ती वाई येथील असल्याचे सांगितले. मात्र डोक्यात गोळी घालून पसार झालेला तो अज्ञात व्यक्ती कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.