जय मल्हार हाऊसिंग सोसायटीमध्ये नारळाच्या झाडावर कोसळली वीज
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह विजांचा लखलखाटात अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली होती. दरम्यान, सदरबाजार परिसरातील जय मल्हार हौसिंग सोसायटीत साडेपाच वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. सातारा शहरासह जिह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला आहे आहे. पावसाने कोठेही नुकसान झाले नसल्याचे समजते. 5 वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने सातारकर अक्षरशः वैतागले होते.
सातारा शहर व परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. मेघगर्जनेसह वाऱयाच्या वेगाने पावसाने सुरुवात केली. यामुळे शहरातील बाजारपेठेत तारांबळ उडाली होती. शहरातील सदाशिव पेठ येथील भाजी मंडई, शुक्रवार पेठ भाजी मंडई येथील व्यापाऱयांनी आपली दुकाने लगेच बंद केली. शहरातील रस्ता ही पावसाने ओलेचिंब झाले होते. वाऱयामुळे शहरात कोठेही नुकसान झालेला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र साडेपाच वाजण्याच्या सुमारास जय मल्हार हाउसिंग सोसायटी परिसरात जाधव यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली आहे. त्यामध्ये नुकसान झाले नाही. दरम्यान हा अवकाळी पाऊस सातारा शहराबरोबरच जिह्यातील काही ठिकाणी पडला असून यामुळे चांगलीच पळापळ उडाली होती.