नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नुकत्याच पूर्ण झालेल्या मे महिन्यात वस्तू-सेवा कराचे संकलन 1 लाख 40 हजार 885 कोटी रुपयांचे झाले आहे. ही कर प्रणाली लागू झाल्यापासून आतापर्यंत चार वेळा करसंकलन 1 लाख 40 हजार कोटींपेक्षा जास्त झाले. तर 2022 मधील मार्च, एप्रिल आणि मे या सलग तीन महिन्यांमध्ये 1 लाख 40 हजार कोटींपक्षा अधिकचा आकडा पार केला आहे, अशी माहिती देण्यात आली.
एप्रिल 2022 या महिन्यात या करसंकलनाने विक्रमी 1 लाख 67 हजार कोटी रुपयांची पातळी गाठली होती. त्या मानाने मेमध्ये संकलन कमी झाले. तथापि, मे मध्ये नेहमीच एप्रिलपेक्षा संकलन कमी होत असते, असे स्पष्टीकरण देण्यात आले. मे महिन्यात करसंकलन 1 लाख 40 हजार कोटीच्या वर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, ही बाबही वित्तविभागाकडून अधोरेखित करण्यात आली आहे.
मे मध्ये केंद्रीय जीएसटीचे संकलन 25,036 कोटी रुपयांचे झाले. राज्य जीएसटी संकलन 32,001 कोटी रुपये तर सामायिक जीएसटी संकलन 73,345 कोटी रुपयांचे झाल्याची माहिती देण्यात आली. सामायिक जीएसटीत 37,469 कोटी रुपयांच्या आयात कराचाही समावेश आहे.
अनुमानापेक्षा जास्त होण्याची शक्यता
जीएसटी संकलनाच्या प्रमाणासंबंधी अर्थतज्ञ आणि उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाचा आणखी एक उद्रेक झाला नाही तसेच अर्थव्यवस्था विस्कळीत होईल असे काही घडले नाही, तर येत्या दोन वर्षांमध्ये करसंकलन मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता असून अर्थसंकल्पांमध्ये व्यक्त केलेल्या अनुमानापेक्षाही ते अधिक होऊ शकते. गेले तीन महिने सलग हे संकलन 1.40 लाख कोटीच्या वर आहे. याचाच अर्थ अर्थव्यवस्था आता सुधारु लागली आहे आणि मागणी वाढू लागली आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.