मावळते सरन्यायाधीश लळित यांचे निरोपसमारंभात उद्गार, आता पदभार न्या. चंद्रचूड यांच्याकडे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘आपल्या 74 दिवसांच्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळासंबंधी आपण समाधानी आहोत, असे उद्गार मावळते सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभात काढले असून 9 नोव्हेंबरपासून नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे हे उत्तदायित्व जाणार आहे. आपण आपली आश्वासने काही प्रमाणात पूर्ण करु शकलो असे प्रतिपादन त्यांनी केले.
मावळते सरन्यायाधीश लळित हे 8 नोव्हेंबरला वयाची 65 वर्षे पूर्ण करीत असून त्याच दिवशी नियमाप्रमाणे ते सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त होत आहेत. मात्र 8 नोव्हेंबर, अर्थात आजच्या मंगळवारच्या दिवशी न्यायालयाला सुटी असल्याने निरोप समारंभ सोमवारीच आयोजित करण्यात आला होता.
10,000 प्रकरणे हातावेगळी
आपल्या 74 दिवसांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने 10 हजारांहून अधिक प्रकरणे हातावेगळी करण्यात यश मिळविले. याच काळात 8,700 नवी प्रकरणे सादर झाली. प्रकरणे हातावेगळी करण्याचे प्रमाण सादर होणाऱया प्रकरणांच्या संख्येपेक्षा जास्त राहिले. त्याचप्रमाणे सदोष याचिका सादर झाल्याने प्रलंबित असलेली 13 हजारांहून अधिक प्रकरणेही संपविण्यात आली. सरन्यायाधीशपदाचा भार स्वीकारताना मी काही आश्वासने दिली होती. सर्वोच्च न्यायालयासमोर असणाऱया प्रकरणांच्या सूचीचे काम सुधारणे आणि वेगवान करणे, किमान एक घटनापीठ सदैव कार्यरत ठेवणे, नेहमीच्या प्रकरणांची सुनावणी लवकरात लवकर करणे इत्यादी ध्येये मी ठेवली होती. ती मी काही प्रमाणात पूर्ण केली याचे समाधान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाला घटनापीठाचा सदस्य होता यावे अशी व्यवस्था मी केली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भावी सरन्यायाधीश उपस्थित
या कार्यक्रमाला भावी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश उपस्थित होते. भावी सरन्यायाधेश चंद्रचूड हे 9 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीशपदाचे उत्तरदायित्व स्वीकारत आहेत. त्यांचा या पदावरील कालावधी 2 वर्षांहून अधिक काळ असेल, अशी माहिती देण्यात आली.