पुरुषांची सलामी स्वित्झर्लंडशी तर महिलांची लढत आज उरुग्वेशी
वृत्तसंस्था/ लॉसेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या आज शनिवारपासून येथे सुरू होणाऱया पहिल्या हॉकी फाईव्ह स्पर्धेत टोकियो ऑम्लिपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया भारतीय संघातील हॉकीपटूंची तंदुरूस्ती, क्षमता यांची सत्त्वपरीक्षा होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात सलामीचा सामना शनिवारी होत आहे. महिला विभागात शनिवारी भारताचा सलामीचा सामना उरूग्वेशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व रजनी एतिमर्पूकडे सोपविण्यात आले आहे.
क्रिकेटप्रमाणेच आता हॉकी क्षेत्र आकर्षक बनविण्यासाठी कमी कालावधीचा तसेच वेगवान खेळ होण्यासाठी पारंपरिक हॉकीमध्ये बदल करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने घेतला आहे. क्रिकेटमध्ये टी-20 हा अतिजलद सुरू असलेल्या प्रकाराप्रमाणेच आता हॉकी क्षेत्रातही हॉकी 5 प्रकार सुरू झाला आहे. क्रिकेट आणि हॉकी या क्रीडाप्रकाराप्रमाणेच रग्बी 7 आणि 3ƒ3 बास्केटबॉल प्रकारातही बदल करण्यात आले आहेत. शौकिनांना अधिक आकर्षित करण्यासाठी विविध क्रीडाप्रकारात हे बदल पहावयास मिळत आहेत.
भारतीय पुरुष हॉकी संघाचे या स्पर्धेसाठी नेतृत्व गुरिंदर सिंगकडे सोपविण्यात आले आहे. नऊ जणांच्या भारतीय संघामध्ये पवन, संजय, रविचंद्र सिंग यांचा समावेश आहे. 2018 च्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये या तीन हॉकीपटूंचा समावेश होता. 2018 च्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत हॉकी 5 हा क्रीडाप्रकार खेळविला गेला होता. हॉकीपटूंच्या तंदुरूस्ती आणि क्षमतेची या स्पर्धेत खरी कसोटी लागणार आहे. हॉकीपटूंना शॉर्ट पासेसवर तसेच वेगवान खेळावर भर द्यावा लागेल. लॉसेनमध्ये होणाऱया या स्पर्धेत शनिवारी भारत आणि यजमान स्वीसचा सलामीचा सामना झाल्यानंतर पाकविरुद्ध भारताचा दुसरा सामना खेळविला जाईल. भारताचे मलेशिया आणि पोलंड बरोबरचे सामने रविवारी होणार आहेत.
महिला विभागात भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना शनिवारी उरूग्वेशी होणार आहे. या स्पर्धेत रजनीच्या नेतृत्वाखाली 9 सदस्यांचा भारतीय महिला हॉकी संघ सहभागी होत आहे. उरूग्वेशी सलामीची लढत झाल्यानंतर शनिवारी भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा सामना पोलंडविरुद्ध होणार आहे. रविवारी 5 जून रोजी भारतीय महिला हॉकी संघाचे सामने अनुक्रमे यजमान स्वीस आणि दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर होणार आहेत. विविध महिला हॉकी संघ हॉकी 5 या नव्या पद्धतीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहेत. भारतीय महिला हॉकी संघाचे उपकर्णधारपद महिमा चौधरीकडे सोपविण्यात आले आहे. नजिकच्या काळात हॉकी 5 स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.