बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ मनिला, फिलिपाईन्स
भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी देत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया व येथे तिसरे मानांकन मिळालेल्या सात्विक-चिराग यांनी थायलंडच्या अपिलुक गेटराहाँग व नॅटचानोन तुलामोक यांच्यावर केवळ 27 मिनिटांच्या खेळात 21-13, 21-9 असा सहज विजय मिळविला. त्यांची पुढील लढत जपानच्या अकिरो कोगा व तायची सायतो यांच्याशी होणार आहे. इशान भटनागर व तनिशा क्रॅस्टो यांनीही दुसरी फेरी गाठली असून त्यांनी हाँगकाँगच्या लॉ चेयुक हिम व येउंग एन्गा टिंग यांच्यावर 21-15, 21-17 अशी मात केली. कृष्णा प्रसाद गरग व विष्णुवर्धन गौड पंजाला यांना मात्र पुरुष दुहेरीत पराभव पत्करावा लागला. प्रसाद व विष्णुवर्धन यांनी झुंजार खेळ केला, पण अखेरीस त्यांना दक्षिण कोरियाच्या कांग मिनहय़ुक व किम वोनहो यांनी 21-10, 19-21, 21-16 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले.