सेरब्रुकेन (जर्मनी) : विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या हायलो खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले.
सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी गेल्या आठवडय़ात फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. जर्मनीतील या स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या सामन्यात बुधवारी चीन तैपेईच्या यांग ली आणि चेन लू यांचा 61 मिनिटांच्या कालावधीत 19-21, 21-19, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.