वृत्तसंस्था/ पॅरिस
बॅडमिंटन दुहेरीतील भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे झालेल्या फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावताना चिनी तैपेईच्या लु चिंग याव व यांग पो हॅन यांच्यावर मात केली.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱया भारतीय जोडीने 2019 मध्ये या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. यावेळी त्यांनी आक्रमक खेळावर भर देत तैपेईच्या 25 व्या मानांकित जोडीवर 21-13, 21-19 अशी मात केली. 48 मिनिटे ही लढत रंगली होती. या वर्षात भारतीय जोडीची शानदार कामगिरी झाली असून त्यांनी इंडियन ओपन सुपर 500, राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण, थॉमस चषक जेतेपद आणि गेल्या ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले. या जोडीचे हे तिसरे वर्ल्ड टूर जेतेपद आहे. यापूर्वी टूरवील त्यांनी 2019 मध्ये थायलंड ओपन सुपर 500, यावर्षी इंडियन ओपन सुपर 500 स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय सुपर 750 स्पर्धा जिंकणारी ही भारताची पहिलीच जोडी आहे.
दोन आक्रमक खेळणाऱया जोडय़ांमधील संघर्षामध्ये सात्विक व चिराग यांनी अखेर यश मिळविले. पहिल्या गेममध्ये सात्विक-चिरागने 21-13 अशी बाजी मारल्यानंतर दुसऱया गेममध्ये दोन्ही जोडय़ांचा तोडीस तोड खेळ झाला. या गेममध्ये लु चिंग व यांग यांनी 10-12 अशी भारतीय जोडीची आघाडी कमी केल्यानंतर 14-14 वर त्यांनी भारतीय जोडीला गाठले. चिरागकडून चूक झाल्यानंतर तैपेई जोडीने आघाडी घेतली. पण भारतीय जोडीने स्वतःला सावरत लगेचच नियंत्रण मिळवित त्यांना 19-19 वर गाठले आणि नंतर दोन गुण घेत गेमसह सामना जिंकत जेतेपद निश्चित केले.
बीएआयकडून सात्विक-चिराग, शंकर मुथुस्वामी यांना 5 लाखाचे बक्षीस जाहीर
भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) सोमवारी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी तसेच वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणाऱया शंकर मुथुस्वामी यांना रोख 5 लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. शंकर मुथुस्वामीने वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविले असून हा पराक्रम करणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. सात्विक-चिराग यांनी पेंच ओपन स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकावले. ‘आपल्या ज्युनियर व सिनीयर बॅडमिंटनपटूंनी अव्वल प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करीत पदके मिळविली असून भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे,’ असे बीएआय अध्यक्ष हिमांता बिस्वा सर्मा बक्षीस जाहीर करताना म्हणाले. बीएआय सचिव संजय मिश्रा यांनीही या खेळाडूंचे कौतुक केले.