ईडीची कोठडी सुनावताच बिघडली प्रकृती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांची कोठडी 13 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज ऍव्हेन्यू न्यायालयाच्या आदेशानंतर बाहेर पडताना जैन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना लोहिया रुग्णालयात हलविण्यात आले. जैन यांनी न्यायालयासमोर जामिनाचाही अर्ज केला आहे.
ईडीने गुरुवारी न्यायालयासमोर जैन यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश गीतांजलि गोयल यांनी ईडीची ही मागणी मान्य केली आहे. जैन कोठडीत असताना ईडीने त्यांच्या दिल्ली-गुरुग्राम येथील 7 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यांदरम्यान सुमारे 2.82 कोटी रुपये रोख आणि 1.80 किलोग्रॅम सोन्याची नाणी आणि बिस्किट्स मिळाली होती. याचबरोबर काही आक्षेपार्ह सामग्री प्राप्त झाली असल्याने जैन यांची चौकशी करावी लागणार असल्याचे ईडीकडून म्हटले गेले होते.
जैन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी ईडीच्या मागणीला विरोध करत जैन हे पूर्वीच कोठडीत असल्याचा युक्तिवाद केला. आरोपीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत गुन्हेगारी कलमांयच अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते अशी माहिती ईडीचे विशेष वकील एन.के. मट्टा यांनी सुनावणीदरम्यान दिली.
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जैन, त्यांच्या पत्नी पूनम आणि इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जैन यांनी कथितपणे दिल्ली अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या किंवा खरेदी केल्याचा आरोप आहे. कोलकात्याच्या तीन हवाला ऑपरेटर्सद्वारे 54 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 16.39 कोटी रुपयांचा काळा पैसा हस्तांतरित केला होता. मागील महिन्यात ईडीने जैन कुटुंब आणि त्यांच्याशी निगडित कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता गोठविली होती.