पंतप्रधान मोदींकडून आमंत्रित ः पुढील महिन्यात एकदिवसीय दौरा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणानुसार सौदी अरेबियाचे युवराज आणि तेथील पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान हे नोव्हेंबरमध्ये भारत दौऱयावर येणार आहेत. सौदीचे युवराज याचबरोबर इंडोनेशियाचा दौरा करणार आहेत. इंडोनेशियाच्या बालीमध्ये जी-20 शिखर परिषदेत सामील होण्यापूर्वी सलमान हे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी भारतात दाखल होणार आहेत. भारतात काही तासांचा दौरा केल्यावर सलमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 15-16 नोव्हेंबर रोजी शिखर परिषदेनिमित्त बालीमध्येही भेटणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबरमध्ये विदेश मंत्र्यांच्या माध्यमातून पत्र पाठवून सलमान यांना भारत दौऱयासाठी आमंत्रित केले होते. द्विपक्षीय चर्चेसाठी सप्टेंबरमध्ये रियाधचा दौरा करणारे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सलमान यांना पंतप्रधान मोदींचे पत्ररुपी निमंत्रण दिले हेते. सलमान आणि पंतप्रधान मोदी हे युक्रेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटावर चर्चा करणार आहेत. पाश्चिमात्य आघाडीच्या निर्बंधांमध्ये भारत तसेच सौदी अरेबियाही सामील झालेला नाही.
ओपेक प्लस समुहाकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री अब्दुलअजीज बिन सलमान यांनी मागील आठवडय़ात भारताचा दौरा केला होता. तसेच त्यांनी चिनी अधिकाऱयांशी ऑनलाइन चर्चा केली होती. ओपेक प्लस समुहाकडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयामुळे अमेरिका आणि सौदी अरेबियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दौऱयाला राजनयिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन देखील सामील होणार आहेत.
सलमान यांच्या भारत दौऱयादरम्यान 200 अब्ज डॉलसच्या गुंतवणुकीच्या आश्वासनाची प्रगती, तेल साठवणूक क्षमता तसेच हरित ऊर्जा प्रकल्पांबद्दल आढावा घेतला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी 2016 आणि 2019 मध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला होता. या दौऱयांदरम्यान अनेक करारा अन् प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती.