वृत्तसंस्था/ राजकोट
2023 च्या रणजी स्पर्धेतील सौराष्ट्रने शनिवारी येथे खेळाच्या शेवटच्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंजाबचा 71 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता या स्पर्धेत सौराष्ट्र, बंगाल, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या चार संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
सौराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात 303 धावा जमवल्यानंतर पंजाबने पहिल्या डावात 431 धावांचा डोंगर उभा करत 128 धावांची भक्कम आघाडी घेतली. सौराष्ट्रच्या दुसऱया डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांची एकवेळ स्थिती 4 बाद 60 अशी होती. पण त्यानंतर सौराष्ट्रचा कर्णधार आर्पित वासवदा आणि चिराग जेनी यांनी पाचव्या गडय़ासाठी 140 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पी. मंकड आणि पार्थ भूत यांनी अर्धशतके नोंदवली. मंकडने 88 तर भूतने 51 धावा जमवल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला पार्थ भूतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकविले. भूतने चेतन सकारिया समवेत नवव्या गडय़ासाठी 61 धावांची तर डोडीया समवेत शेवटच्या गडय़ासाठी 95 धावांची भागीदारी केल्याने सौराष्ट्रने दुसऱया डावात 379 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबतर्फे विनय चौधरीने 179 धावात 7 गडी बाद केले.
त्यानंतर पंजाबला निर्णायक विजयासाठी 251 धावांची जरुरी होती पण सौराष्ट्रच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबचा दुसरा 180 धावात आटोपला. सौराष्ट्रच्या तीन फिरकी गोलंदाजांनी पंजाबचा दुसरा डाव झटपट गुंडाळला. पंजाबच्या दुसऱया डावात मनदीपने 45 तर मानने 42 धावा जमवल्या. सौराष्ट्रच्या अष्टपैलू पार्थ भूतने 89 धावात 5 तर धर्मेंद्रसिंग जडेजाने 56 धावात 3 गडी बाद केले. या सामन्यात सौराष्ट्रचा अष्टपैलू पार्थ भूतने पहिल्या डावात नाबाद 111 तर दुसऱया डावात 51 तसेच त्याने या सामन्यात 203 धावात 8 गडी बाद केले. त्याचप्रमाणे सौराष्ट्रच्या धर्मेंद्रसिंग जडेजाने या सामन्यात 165 धावात 8 बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक ः सौराष्ट्र प. डाव 303, पंजाब प. डाव 431, सौराष्ट्र दु. डाव 379, पंजाब दु. डाव 180.