वृत्तसंस्था/ कोलकाता
येथील इडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या 2022-23 च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर कर्णधार वासवदाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सौराष्ट्रने बंगालवर 143 धावांची आघाडी घेत आपली जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. दिवसअखेर सौराष्ट्रने पहिल्या डावात 5 बाद 317 धावा जमवल्या. तत्पुर्वी बंगालचा पहिला डाव 174 धावावर संपुष्टात आला होता. वासवदा 81 तर चिराग जेनी 57 धावावर खेळत आहेत.
या स्पर्धेत तीन वर्षाच्या अगोदर सौराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात बंगालचा पराभव केला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सौराष्ट्रचा संघाने आता दुसऱ्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
सौराष्ट्रने 2 बाद 81 या धावसंख्येवरून शुक्रवारच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण त्यांचा सलामीचा फलंदाज हार्विक देसाई लवकर बाद झाला. देसाईने 79 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 50 धावा जमवल्या. बंगालच्या पोरलने चेतन साकारियाला 8 धावावर त्रिफळाचित केले. सौराष्ट्रची स्थिती यावेळी 4 बाद 109 अशी होती. जॅक्सन आणि वासवदा या जोडीने पाचव्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी केली. जॅक्सनने 105 चेंडूत 10 चौकारासह 59 धावा झळकवल्या. पोरलने त्याला झेलबाद केले. जॅक्सन बाद झाल्यानंतर वासवदा आणि जेनी या जोडीने सौराष्ट्रला सुस्थितीत नेताना पाचव्या गड्यासाठॅ अभेद्य 113 धावांची भागीदारी केली. वासवदा 11 चौकारासह 81 तर जेनी 10 चौकारासह 57 धावावर खेळत आहे. बंगालतर्फे मुकेशकुमार आणि इशान पोरल यांनी प्रत्येकी दोन तर आकाशदीपने एक गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक : बंगाल प. डाव 54.1 षटकात सर्व 174, सौराष्ट्र प. डाव 87 षटकात 5 बाद 317 (हार्विक देसाई 50, विश्वराज जडेजा 25, साकारिया 8, जॅक्सन 59, वासवदा खेळत आहे 81, जेनी खेळत आहे 57, पोरल 2-72, मुकेशकुमार 2-83, आकाशदीप 1-78).