वृत्तसंस्था/ अम्मान (जॉर्डन)
आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत महिला विभागात भारताच्या सविताला तर पुरुषांच्या विभागात भारताच्या कपिल पोखरिया यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली.
महिलांच्या विभागात जपानच्या सुकुमी नेमाकीने भारताच्या सविताचा पराभव केला. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जपानच्या सुकुमीने कांस्यपदक मिळविले होते. गुरुवारी झालेल्या लढतीत सुकुमीने तिन्ही फेऱयांमध्ये सवितावर गुणांची आघाडी मिळवित ही लढत एकतर्फी जिंकली. पुरुषांच्या विभागात इराणच्या पी. अमिरीने कपिल पोखरियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. भारताच्या शिवा थापाची लढत शुक्रवारी येथे उशिरा होत आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या 25 मुष्टियोद्धय़ांचे पथक सहभागी झाले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया लोव्हलिना बोरोगेनचा या संघात समावेश आहे. पुरुषांच्या विभागात मोहम्मद हुसामुद्दिन आणि लक्ष्य चहर यांनी आपले विजय नोंदवित पुढील फेरी गाठली असून भारताच्या स्पर्श कुमारला बुधवारी झालेल्या लढतीत हार पत्करावी लागली.