महिला प्रो लीगसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा, पहिल्या टप्प्यात बेल्जियम, हॉलंडविरुद्ध सामने
नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या होणाऱया महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी शनिवारी 24 सदस्यांचा भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला असून सविताकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेचा भारतीय महिला संघाचा युरोपियन टप्पा येत्या जूनमध्ये खेळविला जाणार असून त्यांचे पहिल्या टप्प्यातील सामने बेल्जियम आणि हॉलंडमध्ये होतील.
या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचे एकूण सहा सामने 11 ते 22 जून दरम्यान खेळविले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा स्पेन आणि हॉलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 ते 17 जुलै दरम्यान होणार आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय महिला संघाला प्रो लीग स्पर्धेतील सामने सरावाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहेत.
भारत आणि यजमान बेल्जियम यांच्यातील दोन सामने 11 आणि 12 जूनला अँटवर्प येथे खेळविण्यात येणार आहेत. हे सामने यापूर्वी रॉटरडॅम येथे खेळविण्यात येणार होते. पण, त्यानंतर या सामन्यांच्या ठिकाणात बदल करण्यात आला. भारतीय महिला हॉकी संघाचे अर्जेंटिना संघाविरुद्ध दोन सामने 18 आणि 19 जूनला होणार आहेत. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील दोन सामने 21 आणि 22 जूनला होतील.
या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने गोलरक्षक सविताकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे. गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर हुकमी खेळाडू राणी रामपाल या स्पर्धेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. राणी रामपालला स्नायु दुखापती समस्या बरेच दिवस त्रास देत होती. ही दुखापत आता बरी झाली असून तिचा गेल्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील हॉलंडविरूद्ध दोन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण ती या स्पर्धेत खेळू शकली नाही. आगामी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे उपकर्णधारपद अनुभवी दीप ग्रेस एक्काकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारतीय महिला संघ सध्या दुसऱया स्थानावर आहे. अर्जेंटिनाने 8 सामन्यांतून 22 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. 4 आणि 5 जून रोजी होणाऱया प्रो लीग हॉकी स्पर्धेतील स्वीसविरूद्ध सामन्यात भारतीय महिला संघाचे नेतृत्व रजनी इटीमेरपुकडे सोपविण्यात आले असून महिमा चौधरी उपकर्णधार असेल.
भारतीय महिला हॉकी संघ- गोलरक्षक- सविता (कर्णधार), के. बिचूदेवी, बचावफळी- दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निकी प्रधान, उदिता, इशाका चौधरी, अक्षता ढेकळे, मध्यफळी- नीशा, सुशिला छानू, मोनिका, नेहा, ज्योती, नवज्योत कौर, सोनिका, सलिमा टेटे, बलजीत कौर, आघाडी फळी- वंदना कटारिया, लालरिमेसिमी, नवतीत कौर, शर्मिला देवी, संगिता कुमारी, दीपिका, राणी.