नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे 22 वे उपराज्यपाल (नायब राज्यपाल) म्हणून विनय कुमार सक्सेना यांनी गुरुवारी राज निवास येथे आयोजित समारंभात शपथ घेतली. आपण लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नव्हे तर शहराचे स्थानिक पालक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्पष्ट केले. 64 वर्षीय सक्सेना यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश बिपिन सांघी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, दिल्लीचे खासदार आणि आमदार आणि उच्चपदस्थ अधिकारी या समारंभाला उपस्थित होते. दरम्यान, या शपथविधी सोहळय़ात उपस्थित राहिल्यानंतर योग्य आसन न मिळाल्याने केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी क्रोधित होत कार्यक्रमातून काढता पाय घेतल्यासंबंधीचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. या प्रकाराबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.