श्रेया पोटे मालिकावीर, फरान सामनावीर पुरस्काराचे मानकरी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गुडशेफर्ड येथे क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट आयोजित एस. बी. मुरारी स्मृती चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने सीसीआय संघाचा 6 धावांनी पराभव करुन एस. बी. मुरारी चषक पटकाविला. 37 धावा करणाऱया फरानला सामनावीर तर श्रेया पोटेला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
गुडशेफर्ड मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 4 बाद 117 धावा केल्या. फरानने 37, अथितने 20, अब्बासने 18 तर अर्जुनने 16 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयम, वरदराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआयने 20 षटकात 5 बाद 111 धावा केल्या. झोया काझीने 53, श्रेया पोटेने 21 तर खांडूने 10 धावा केल्या. युनियन जिमखानाच्या अब्बासने 2 तर सुरज आणि फरानने प्रत्येकी एक गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश सोनवालकर, डॉ. श्वेता सोनवालकर, डॉ. शंकर पाटील, सुरेखा मुरारी, संदीप मुरारी, प्रिया मुरारी, दशरथ नाडुगिरी, महेंद्रकुमार काळे, अमित काळे, अपर्णा काळे, ताहीर सराफ यांच्या हस्ते विजेत्या युनियन जिमखाना व उपविजेत्या सीसीआय संघाला चषक देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर फरान, उत्कृष्ट फलंदाज झोया काझी, उत्कृष्ट गोलंदाज हमजा एस., इम्पॅक्ट खेळाडू फरान शेख, उगवता खेळाडू वरदराज पाटील आणि मालिकावीर म्हणून श्रेया पोटे यांना चषक देवून गौरविण्यात आले.