ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश रशियावर निर्बंध लादत आहेत. भारताने या प्रकरणात अलिप्तवादाची भूमिका घेतली असली तरी देखील भारतीय स्टेट बँकेने या प्रकरणात मोठे पाऊल उचलत रशियाची आर्थिक कोंडी केली आहे. रॉयटर्स आणि या प्रकरणाशी संबंधीत लोकांच्या हाती यासंदर्भातील पत्र लागले आहे. या पत्राच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.
अमेरिका, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या रशियन संस्थांशी कोणताही आर्थिक व्यवहार न करण्याचा निर्णय एसबीआयने घेतला आहे. या प्रकरणी एसबीआयने आपल्या काही ग्राहकांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार एसबीआयने म्हटले आहे की, अमेरिका, युरोपियन युनियन किंवा संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांच्या यादीत समाविष्ट असलेल्या संस्था, बँका, बंदरे किंवा जहाजांशी संबंधित कोणतेही व्यवहार एसबीआय पूर्ण करणार नाही.
एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, आमचे व्यवहार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असतात. त्यामुळं आम्हाला अमेरिका आणि युकेच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. कारण आम्ही त्यांच्या अधिकारक्षेत्रात काम करतो. त्यामुळं आम्हाला त्यांच्या नियमांचं पालन करावचं लागणार आहे.