वाढीसोबत नफा 9113 कोटी रुपयांच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्टेट बँकेने मार्चमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीचा अहवाल नुकताच सादर केला आहे. यामध्ये बँकेचा निव्वळ नफा हा 41.27 टक्क्यांनी वाढून 9,113.53 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. एक वर्षाच्या अगोदर चालू तिमाहीत हा आकडा 6,450.75 कोटी रुपये होता. हा बँकेचा उच्चांकी तिमाही नफा राहिला असल्याचेही बँकेने सांगितले आहे. स्टेट बँकेच्या मंडळाने 7.10 रुपये प्रती समभागाच्या लाभांशाला मंजुरी दिली आहे.
चालू तिमाहीत स्टेट बँकेचे निव्वळ उत्पन्न 31,198 कोटी रुपये राहिले आहे. हा मागील वर्षातील घोषित केलेल्या 27,067 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या 15.26 टक्के अधिक राहिले आहे. आर्थिक वर्ष 22 साठी नफा हा 5.22 टक्क्यांनी वधारुन 75,292 कोटी रुपये झाला आहे. तर चौथ्या तिमाहीत नफा 19,717 कोटींवर पोहोचला आहे.