गुहागर पोलिसांची यशस्वी कामगिरी, राजस्थानमधील जयपूरमधून केली अटक
प्रतिनिधी/ गुहागर
क्रेडीट कार्डमधील लावण्यात येणारा जादा चार्ज रद्द करून देतो, असे सांगत क्रेडीट कार्डची संपूर्ण माहिती घेत फिर्यादीच्या खात्यामधील तब्बल 79 हजार 999 रूपये लांबवणाऱया सायबर गुन्ह्य़ातील जिल्ह्य़ातील पहिला आरोपी गुहागर पोलिसांनी अटक केला आहे. गुहागरच्या तपासी पथकाने राजस्थानमधील जयपूर येथे जाऊन आरोपीला अटक करून यशस्वी कामगिरी केली आहे.
विशाल सिंग शेखावत उर्फ राजेंद्र सिंह शेखावत (रा. राजस्थानमधील जयपूर बेनार रोड, मुळ गाव पटपटगज दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी गुहागर पोलीस ठाण्यात या बाबतचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी यांचे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधील लावण्यात येणारे जादा चार्जेस रद्द करून देतो, असे फोनद्वारे संपर्क साधून फिर्यादी यांना खोटे सांगितले. आरोपीने फिर्यादी यांचे आयसीआयसी क्रेडिट कार्डमधील 16 अंकी नंबर तसेच सी व्ही व्ही क्रमांक व ओटीपी सांगण्यास सांगून त्यांचे क्रेडिट कार्डमधील रू. 79 हजार 999 एवढी रक्कम ही फिर्यादी यांच्या नकळत स्वतःच्या खात्यात अपहरित केली होती. या प्रकरणी आरोपीवर कलम 420, 419 भादंविकसह 66 क 66 ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, पोलीस हवालदार हनुमंत नलावडे, पोलीस नाईक राजेश धनावडे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ तसेच टॅब पथकाचे पोलीस हवालदार रमिझ शेख या पथकाने गुन्ह्य़ातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. लाभार्थी बँक खाते व तांत्रिक तपास करून यातील एक लाभार्थी बँक खाते हे विशाल सिंग शेखावत उर्फ राजेंद्र सिंह शेखावत
(रा. जयपूर बेंनार रोड, जिल्हा जयपूर, राज्य राजस्थान, मूळ रा. पटपटगज दिल्ली) येथील असल्याचे कळले. या तपास पथकाने राजस्थान येथे जावून आरोपीचा शोध सुरू केला. या आरोपीचे बँक खाते मर्चंट सर्व्हिसमध्ये लिंक असल्याची माहिती मिळाली. यानंतर विशाल सिंग शेखावत याला तेथून चौकशीकामी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणले. त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी विशाल याने ‘हाऊसिंग डॉट कॉम’ या बनावट लिंकद्वारे प्रथम फर्स्ट डाटा या मर्चंट मशीनवर घेतले. हे पैसे पुढे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर होऊन पुढे हे पैसे दिल्ली येथील एटीएमद्वारे काढल्याचे सांगितले. या आरोपीला गुहागर पोलीस ठाण्यात आणून बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.