वार्ताहर /पणजी
गोमंतक मराठा समाज, गोवा संस्थेच्या सहकार्याने तिसवाडी तालुका समितीने 28 विद्यार्थ्यांना 32 हजार दोनशे रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण नुकतेच एका खास कार्यक्रमात केले.
गोमंतक मराठा समाज, गोवा संस्था दरवर्षी विविध तालुक्यातून इ. सहावी ते उच्च शिक्षण घेणाऱया हुशार, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करते. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना सुमारे 32 हजारहून अधिक रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण येथील समाज सभागृहात तिसवाडी तालुका समितीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक तथा पत्रकार राजू भिकारो नाईक उपस्थित होते. खास पाहुणे म्हणून सरकारी अधिकारी भालचंद्र आमोणकर व समाजकार्यकर्ते रोहिदास नाईक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ छायापत्रकार उमेश बाणस्तारकर, समाजाच्या केंद्रीय समितीच्या माजी सदस्य उत्कर्षा बाणस्तारकर तसेच शिक्षणात आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेले युवा अजिंक्य औदुंबर वळवईकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रथम गोमंतक मराठा समाज तिसवाडी तालुका समितीच्या अध्यक्ष सुनिता पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून तिसवाडी तालुका राबवित असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती विद्यार्थी वर्ग व पालकांना दिली. यावेळी प्रमुख पाहुण राजू नाईक यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर, संस्कारक्षमता, कलाकौशल्य, जिद्द, ध्येयनिष्ठता, सकारात्मकतेची गरज आहे. भालचंद्र आमोणकर, सत्कारमूर्ती उमेश बाणस्तारकर, अजिंक्य वळवईकर, रोहिदास नाईक यांनीही मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये ध्रुवा सचिन विर्डीकर, तन्वी नितीन आमोणकर, तस्मय अनंत नाईक, नेहाल देवानंद रायकर, निधी नित्येंद्र वेरेकर, मयुरी प्रकाश नाईक आमोणकर, प्रसिद्धी सदानंद आमोणकर, अमन सुरज शिरगांवकर, वनथिंता धीरज नाईक, तनीशा गजानन आमोणकर, निधी प्रदीप तिवरेकर, वैभवी विनायक केसरकर, शौनक विरेंद्र वेरेकर, रवळू जितेंद्र सावईवेरेकर, सिया संकेत काकोडकर, साईल निलेश आरोस्कर, शुभम देविदास रायकर, मिथाली चंद्रशेखर नाईक, सोनिया सुरेश रायकर, सिद्धांक दिनेश रायकर, गायत्री प्रशांत माशेलकर, उत्तम वासुदेव विर्डीकर, सायली जितेंद्र सावईवेरेकर, आदित्य सुरज शिरगांवकर, चैताली चंद्रशेखर नाईक, अनिशा दिनेश रायकर, तन्वी अनंत नाईक व अनिषा निलेश आरोस्कर यांचा समावेश आहे.
प्रशांत माशेलकर यांनी सूत्रसंचालन केले. सिमरन काकोडकर यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. श्रद्धा नाईक, नरेश आमोणकर, पद्मा नाईक यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.