समाजाचा शैक्षणिक प्रकल्प हे प्रगतीचे पुढचे पाऊल : सभापती रमेश तवडकर यांचे उद्गार
वार्ताहर /खोल
गोमंतक मराठा समाजाच्या काणकोण शाखेचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा नगर्से, काणकोण येथील श्री दत्तमंदिर सभागृहात नुकताच झाला. यावेळी सभापती रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत समाजाच्या शशिकलाताई काकोडकर शैक्षणिक प्रकल्प बांधकाम समितीचे अध्यक्ष गोरख मांदेकर विशेष अतिथी तसेच केंद्रीय समितीचे सचिव मंगेश कुंडईकर, श्रीकृष्ण आस्कांवकर, नंदकिशोर शिरगावकर, सहसचिव सतीश पैंगीणकर, काणकोण शाखेचे अध्यक्ष रमाकांत बांदेकर व सचिव वसंत देविदास व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर होते.
काणकोण तालुक्मयातील समाज व समाजेतर एकूण 133 हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना एकंदर 1 लाख 17 हजार 600 रुपयांच्या शिष्यवृत्त्यांचे वितरण सभापती तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. काणकोण तालुक्मयातून दहावी परीक्षेत 97.17 टक्के गुण मिळवून समाज पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पूर्वा प्रमोद नाईक तसेच चित्रकला, रांगोळी व हस्ताक्षर स्पर्धांत यश मिळविलेल्या राज गुरुनाथ लोलयेकर यांना सन्मानित करण्यात आले.
काणकोण तालुक्मयातून पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या गोमंतक मराठा समाजातील पाच जणांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यात पंच अजित (अजय) लोलयेकर, आशुतोष बांदेकर, सरपंच प्रतिजा बांदेकर(लोलये पंचायत) आणि पंच सतीश पैंगीणकर व उपसरपंच सुनील पैंगणकर (पैंगीण पंचायत) यांचा सभापतींच्या हस्ते शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. गोरख मांदेकर यांच्या हस्ते सभापती रमेश तवडकर यांचाही सत्कार करण्यात आला.
भाऊसाहेब बांदोडकरांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचविली. त्यामुळे बहुजन समाज साक्षर व सुशिक्षित झाला याबद्दल दुमत नाही. समाजाच्या माध्यमातून साकारणारा शशिकलाताई काकोडकर शैक्षणिक प्रकल्प हे प्रगतीचे पुढचे पाऊल असून आपलाही या प्रकल्पात आर्थिक सहभाग राहील, असे शिष्यवृत्ती वितरणानंतर बोलताना सभापती तवडकर यांनी सांगितले. गोरख मांदेकर यांनी शैक्षणिक प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
आनंद वाघुर्मेकर यांनी समाजाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ घेताना विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांत नेत्रदीपक यश प्राप्त करावे, असे आवाहन केले. समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यासाठी सभापती या नात्याने तवडकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली मंगेश कुंडईकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. रमाकांत बांदेकर यांनी स्वागत, तर सतीश पैंगीणकर यांनी प्रास्ताविक केले. वसंत देविदास यांनी अहवाल व शिष्यवृत्त्यांच्या यादीचे वाचन केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र खोलकर यांनी केले व त्यांनीच नंतर आभार मानले.