पालकांचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
गुरूकुल प्रायमरी स्कूल शाहुनगर सातारा येथे आमच्या पाल्याचे आर.टी.ई या योजनेअंतर्गत दर्जेदार शिक्षण घेत असून याबाबत आम्ही पुर्ण समाधानी आहोत आमच्या पाल्याचे आर.टी.ई अंतर्गत शिक्षणाच्या बाबत शासनाने पालकत्व स्विकारले आहे. परंतु त्याची शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 या वर्षांची शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती आपल्या शिक्षण विभागाकडून अद्याप जमा झालेली नाही यामुळे एका चांगल्या शिक्षण संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर आर्थिकदृष्टया ताण येत आहे व हे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे थकीतचे वेतन त्वरीत मंजुर करण्यात यावे, याबाबतचे निवेदन नुकतेच पालकांच्यावतीने जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी मंगेश सोडकर, दिग्विजय तारळकर, अमृता फडतरे, लिना माने, जुनैद मोमीन, अजित काळे, अमोल पवार, देवेंद्र ढाणे, सुवर्णा वाघमारे, सुरज चव्हाण, सागर ससाने, रेश्मा जाधव, ज्योती कुलकर्णी, आदी पालक उपस्थित होते. आमच्या पाल्याची शैक्षणिक फी त्वरित शाळेला अदा करण्यात यावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असेही यावेळी निवेदना अंतर्गत सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी अद्याप थकित निधी आलेला नसुन, निधी मिळताच त्वरीत शाळांना देण्यात येईल. तसेच थकीत निधी लवकरात लवकर देण्यात यावा, याकरीता आमच्यातर्फे ही विभागाला पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले.