पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने थैमान घातले असून, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या (दि.14) पुणे व पिंपरीतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व पिंपरी महापालिकेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून, अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा, खासगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ. शाळांना 14 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेनेदेखील 14 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) 14 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरक्षेच्या कारणाने विद्यार्थी आणि शिक्षकांना बुधवारी संध्याकाळी 4 नंतर घरी जाण्याची मुभा दिली.
हेही वाचा : ‘नीट’चे प्रवेशपत्र उपलब्ध