ऑनलाईन टीम / मुंबई :
सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी स्कॉर्पीन श्रेणीतील (scorpene class submarine) पाणबुडी INS वागशीर (vagsheer) आज मुंबईत लाँच करण्यात आली. प्रकल्प-75 चा भाग म्हणून मुंबईतील माझगाव डॉक्स शिपबिल्डर्सने बांधलेली ही सहावी पाणबुडी आहे. ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून, आधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रकिंग सिस्टमसह सुसज्ज आहे. यासोबतच विविध प्रकारच्या शस्त्रांचाही या पाणबुडीत समावेश करण्यात आला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अजय कुमार म्हणाले, प्रोजेक्ट-75 अंतर्गत भारताच्या संरक्षणासाठी आतापर्यंत 5 आधुनिक पाणबुडय़ा तैनात आहेत. INS कलवरी, INS खांदेरी, INS करंज आणि INS वेला सध्या भारतीय नौदलाला सेवा देत आहेत. INS वगीरची सागरी चाचणी सुरू आहे. आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सहावी आणि शेवटची स्कॉर्पीन पाणबुडी INS वागशीर भारतीय नौदलात सामील होण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही कठोर चाचणीतून जाईल. वागशीरच्या वर्षभर समुद्री चाचण्या होणार आहेत. त्यानंतर ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होणार आहे.
नवीन वागशीर पाणबुडी हा त्याच्या जुन्या आवृत्तीचा नवीन अवतार आहे. हिंदी महासागराच्या खोल भागात आढळणाऱ्या एका प्राणघातक शिकारी माशाच्या नावावरून आयएनएस वागशीर हे नाव देण्यात आले आहे. पहिली ‘वागशीर’ पाणबुडी डिसेंबर 1974 मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली होती, त्याची सेवा एप्रिल 1997 मध्ये बंद करण्यात आली आहे.