बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर बेळगुंदी फाटय़ानजीक अपघात
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाटा (गणेश दूध संकलन केंद्र) या ठिकाणी बेळगावहून शिनोळीच्या दिशेने जाणाऱया स्कॉर्पिओने राकसकोप मार्गापासून बेळगाव-वेंगुर्ला मार्गाकडे येणाऱया दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांना जबर मार लागला. यामध्ये एकाचा पाय निकामी झाला तर दुसऱयाच्या डोकीला मार लागल्याने चेहऱयाचा भाग खराब झाल्याचे समजते. दोघांची प्रकृती चिंताजनक असून सदर घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
बेळगुंदी फाटय़ानजीक असलेल्या एका कंपनीतील दोन कामगार बेळगाव-वेंगुर्ला मार्गाकडे येत होते. या फाटय़ावर आल्यानंतर चंदगडच्या दिशेने जाणाऱया स्कॉर्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यामध्ये एकाचा पाय निकामी झाला तर दुचाकी चालविणाऱयाच्या डोकीला जबर मार लागून त्याचा चेहरा खराब झाल्याचे समजते. सदर घटनेनंतर गणेश दूध संकलन केंद्रातील सुधाकर करटे व प्रवीण देसाई यांनी तातडीने रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्याची व्यवस्था केली. अपघातानंतर स्कॉर्पिओसह चालक फरार झाला आहे.
अपघातस्थळी अनेकवेळा प्रवासीवर्गातून गतिरोधक घालण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठा खड्डाही असून या खड्डय़ामध्ये अनेकवेळा अपघात झाले आहेत. गतिरोधक नसल्याने मृत्यूचा सापळाच या ठिकाणी बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला कधी जाग येणार? असा संतापजनक प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.