केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एसडीएमसी ए धारवाड संघाने आनंद अकादमीचा 10 गडय़ांनी, सीसीआय संघाने निना स्पोर्ट्स संघाचा 98 धावानी तर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने युनियन जिमखाना अ संघाचा 9 गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. परिक्षित उकुंडी, आदर्श हिरेमठ, वैभव कुरूबागी, आदर्श यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए हुबळी येथे घेण्यात आलेल्या या सामन्यात आनंद अकादमी संघाने 50 षटकात 9 बाद 246 धावा केल्या. राहुल नाईकने शतक झळकविले. यश कळसण्णावरने 40, साहील पारिश्वाडने 27, प्रसाद सुगुर व तुषार यांनी प्रत्येकी 15, विनोद देवाडीगाने 13 तर हर्षने 10 धावा केल्या. एसडीएमसी धारवाडतर्फे परिक्षित उकुंडीने 41 धावात 3, सिद्धार्थ व हेमंत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएमसी ए संघाने 39.4 षटकात बिनबाद 247 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. परिक्षीत उकुंडीने नाबाद 119 तर आदर्श हिरेमठने नाबाद 120 धावा करून दोघांनी शतके झळकवीत पहिल्या गडय़ासाठी 247 धावांची सलामीची विक्रमी भागीदारी केली.
दुसऱया सामन्यात सीसीआय संघाने 50 षटकात सर्व बाद 193 धावा केल्या. वैभवने 62, रवीचंद्र उकलीने 33, पुरूषोत्तम जकाबलने 20, भारत भाटीने 15, शिवप्रसाद हिरेमठ व आकाश यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. निना स्पोर्ट्सतर्फे प्रशांत मुतकेकर व माजिद मकानदार यांनी प्रत्येकी 3 तर संतोष पाटील, अंगदराज हित्तलमनी, नाशीरखान पठाण यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्ट्स संघाचा डाव 22.2 षटकात 95 धावात आटोपला. अंगदराज हित्तलमनीने 20, संतोष सुळगेपाटीलने 17, प्रशांत मुतकेकरने 12 धावा केल्या. सीसीआयतर्फे वैभव कुरूबागीने 14 धावात 5, स्वप्नील एळवेने 23 धावात 2, स्वयं अप्पण्णावर, पुरूषोत्तम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात युनियन जिमखाना संघाने 46.3 षटकात सर्व बाद 146 धावा केल्या. ऋषिकेश रजपुतने 55, वैष्णव संघमित्रने 23, अमेय भातकांडेने 22, सईद मलीकने 20 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे आदर्श प्रकाशने 28 धावात 3, आकाश पत्तार, प्रणव भाटीया, विठ्ठल हबीब यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लबने 15.4 षटकात 1 बाद 150 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. चिराग आर.ने नाबाद 73, राहुलसिंग रावतने नाबाद 49, सुधन्वा कुलकर्णीने 24 धावा केल्या. जिमखानातर्फे ऋषिकेश रजपूतने 1 गडी बाद केला.