कथित निधी दुसरीकडे वळविल्याबद्दल कारवाई
नवी दिल्ली
कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (सीडीइएल) वर 26 कोटी रुपयांचा दंड सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी ठोठावला आहे. सेबीने कथित निधी अन्यत्र वळवल्याबद्दल सीडीइएलला हा दंड केला आहे. सीडीइएल ही कॅफे कॉफी डेची मूळ कंपनी आहे.
सेबीचे पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया यांनी या संदर्भात कारवाईचे निर्देश दिले आहेत. कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) शी सल्लामसलत करून या आदेशाच्या 60 दिवसांच्या आत थकबाकीच्या वसुलीसाठी स्वतंत्र कायदा फर्म नियुक्त करण्यात येणार असल्याचेही भाटिया यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
निधी प्रवर्तकाशी संबंधित कंपनीकडे वळवला
सेबीच्या तपासात, सीडीइएलच्या सात उपकंपन्यांमधून 3,535 कोटी रुपयांची रक्कम म्हैसूर ऍमलगमेटेड कॉफी इस्टेट लिमिटेडकडे वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
व्हीजी सिद्धार्थ यांची आत्महत्या
जुलै 2019 मध्ये, कॉफी डे ग्रुपचे अध्यक्ष व्हीजी सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली आणि एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘माझी टीम, ऑडिटर्स आणि वरिष्ठ व्यवस्थापन माझ्या सर्व व्यवहारांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.’ या व्यवहाराशी संबंधित माहिती कुटुंबासह सर्वांपासून लपवून ठेवली असल्याची नोंद आहे.