वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथील कलिंगा स्टेडियमवर रविवारी झालेल्या भारतीय महिलांच्या लीग फुटबॉल स्पर्धेत ओडिशा स्पोर्ट्सने दुसरा विजय नोंदविताना पिफा स्पोर्ट्सचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 14 व्या मिनिटाला ओडिशा स्पोर्ट्स संघाचा पहिला गोल नोंदविला गेला. जेसोदा मुंडाने उजव्या बगलेतून मारलेला फटका पिफा संघाची गोलरक्षक अंजलीने थोपविण्याचा प्रयत्न केला पण चेंडू गोलपोस्टमध्ये प्रवेश केल्याने अंजलीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. सामन्याच्या पूर्वार्धात ओडिशा स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी चेंडूवर आपला ताबा अधिक वेळ राखला होता. 60 व्या मिनिटाला ओडिशा स्पोर्ट्सला कॉर्नर मिळाला. जेसोदा मुंडाने या कॉर्नरवर मारलेला फटका पिफाच्या गोलरक्षकाने आडविण्याचा प्रयत्न केला पण गोलपोस्टजवळ सुभद्रा साहुने संधीचा फायदा घेत ओडिशा स्पोर्ट्सचा दुसरा गोल नोंदविला. सुभद्रा साहुने 65 व्या मिनिटाला ओडिशा स्पोर्ट्सचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून पिफा स्पोर्ट्सचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत ओडिशा स्पोर्ट्सने पाचपैकी तीन सामने जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले आहे.