रेल्वेगेट बंद होत नसल्याचा प्रकार : वाहनचालक ताटकळत
प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट येथील फाटकाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास रेल्वेगेट बंद होत नसल्यामुळे वाहनचालकांना बराचवेळ रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूनी ताटकळत थांबावे लागले. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे रेल्वेगेटची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
रात्री रेल्वे येण्यापूर्वी गेट बंद करण्याचा प्रयत्न गेटमनने केला. परंतु काँग्रेस रोडच्या बाजूने असणारे फाटक बंद होत नव्हते. काही अंतरावर जावून फाटक पुन्हा वर येत होते. बंद करण्याचा प्रयत्न करूनही फाटक बंद होत नसल्यामुळे गेटमनची धावपळ सुरू होती. दहा मिनिटांनी रेल्वे येऊन मार्गस्थ झाली. त्यानंतर रेल्वेगेट खुले करण्यात आले. रेल्वेगेटची दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या गेटची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.