निविदा सादरीकणास मुदतवाढ
पणजी : राज्यातील खाण लीजांच्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावाची प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होणार असून, 20 ते 28 एप्रिल या दरम्यान सुधारित वेळापत्रकानुसार खाण लीजांच्या दुसऱ्या फेरीचा ई-लिलाव होणार आहे. खाण खात्याने पाच खाणींच्या ब्लॉकच्या लिलावासाठी निविदा सादर करण्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत काल बुधवारी वाढवली आहे. या वाढीव मुदतीमुळे खाण व्यवसाय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. निविदा कागदपत्रे खरेदी करण्याची मुदत केवळ 30 मार्चपर्यंत असल्याने खरेदीदारांची धावपळ उडाली आहे. तांत्रिक निविदा सादर करण्यासाठी खाण खात्याने 5 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. ई-लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात विकल्या जाणाऱ्या पाच खाण लिजांमधून 89.2 दशलक्ष टन लोहखनिजाचा साठा उपलब्ध आहे. या सर्व साठ्याची अंदाजे 12 हजार कोटी इतकी रक्कम होते.