ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची येत्या 14 मे रोजी बीकेसी मैदानावर विराट सभा होणार आहे. शिवसेनेने या सभेचा दुसरा टीझर ट्विट केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दिसत आहेत. “मुंबई आपल्या साहेबांची, काही कोणाच्या बापाची,” दादागिरी कशी मोडून काढायची, हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्वाच्या व्याख्येतून समजून सांगितलं आहे, असा व्हॉईस या व्हिडिओला देण्यात आला आहे. तसेच खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असं आवाहन शिवसेनेनं टीझरमधून केलं आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने या सभेचा पहिला टीझर लाँच केला होता. या पहिल्या टीझरच्या सुरुवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते. मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असं शिवसेनाप्रमुख बोलताना दिसत आहेत. ढोलाच्या दणदणाटावर कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा ऐकू येतात. त्यानंतर साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असं निवेदक सांगतो. शेवटी 14 मे सायंकाळी 7 वाजता, बीकेसी मैदान ही सभेची तारीख, वेळ आणि स्थळ दाखवले जाते. या व्हिडीओत तुंडूंब गर्दीने भरलेली शिवसेनाप्रमुखांची सभा, त्यांचं भाषण आणि उद्धव ठाकरे यांची सभाही दाखवण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी मास्क न लावता भाषण केले. त्यावेळी मनात बरचं साचलंय ते 14 तारखेच्या सभेत बोलणार आहे. अनेकांचे मास्कही उतरवणार आहे, असा इशारा दिला होता. त्यामुळे अनेकांचं लक्ष या सभेकडे लागले आहे.