सोनाली फोगाट खूनप्रकरण : अधिक चौकशीसाठी गोवा पोलिसांचे पथक हरयाणात
प्रतिनिधी /पणजी
सोनाली फोगाट खूनप्रकरणी गुप्त अहवाल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पाठविण्यात आला असून संशयितांविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिक चौकशी – तपासण्यात करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक हरयाणात पोहोचले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, गोवा पोलिसांनी केलेली चौकशी, तपासकाम याबाबत आपण समाधानी आहे. संशयित म्हणून ज्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. डीजीपीनी दिलेल्या सूचनेनुसार कुर्लिस बार – रेस्टॉरंटला टाळे ठोकण्यात आल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
हरयाणा सरकारला देण्यात आलेल्या अहवालाने ते सरकार जर समाधानी नसेल आणि हे प्रकरण जर सीबीआयकडे देण्यात यावे अशीच मागणी असेल तर त्यावर पुनर्विचार होईल. त्यानंतर गरज भासली तरच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
दरम्यान, सोनारी फोगाट यांचा खून करण्यामागील कारण कोणते? यावर अद्याप प्रकाशझोत पडलेला नाही. खुनातून नेमके काय साध्य करायचे होते आणि खुनामागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याबाबत पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.