संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा सत्ताधाऱ्यांवरआरोप
कोल्हापूर/प्रतिनिधी
कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रीया संस्था गटाच्या विभाजनला सभासदांमधून होत असलेला विरोध पाहून सत्ताधाऱयांनी सभा गुंडाळल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी समांतर सभेत केला. तसेच या गटाच्या विभाजनाबाबत एकाही सभासदाची मागणी नसतानही केवळ माझे व खासदार संजय मंडलिक यांचे खच्चीकरण करण्यासाठी सत्ताधाऱयांनी विभाजनाचा डाव केल्याची टिकाही संचालक पाटील यांनी केली.
जिल्हा बँकेच्या सभेमध्ये पोटनियम दुरुस्तीच्या ठरावावरुन काहीकाळ गोंधळ उडाला. या गदारोळातच या ठरावाला मंजूरी देण्यात आल्याने विरोधी आघाडीतील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सभागृहाबाहेर समांतर सभा घेत सत्ताधाऱयांवर टिका केली.
संचालक पाटील म्हणाले, सभेमध्ये नऊ नंबरचा विषय पोटनियम दुरुस्तीचा होता. पोटनियम दुरुस्तीमध्ये शासनाने चार जागा वाढवल्या त्या कुठे वाढवायच्या एवढाच प्रश्न होता. कृषी पणन संस्था गटाच्या विभाजनाचा असा कोणताही अध्यादेश शासनाने काढलेला नाही. बँकेच्या स्थापनेपासून हा गट आहे. या गटातून मी व खासदार संजय मंडलिक निवडून आलो हे काही लोकांना सहन झाले नाही. त्यामुळे हा मतदार संघ विभागायचा आमच्या दोघांचे मतदार संघ वेगवेगळे करायचे असा कुटील डाव डोक्यात ठेवून हा मतदार संघ विभागला गेला. या ठरावाला सभासदांनी विरोध दर्शविला. हा गट पुर्वीप्रमाणे ठेवण्याची मागणीही सभासदांनी केली. मात्र सभासदांचे म्हणने ऐकून न घेता, त्यांचा विरोध पाहून सत्ताधाऱयांनी लगेच राष्ट्रगीत म्हणत सभा गुंडाळल्याचा आरोप संचालक पाटील यांनी केला.
आम्हाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न
बँकेची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र मी, खासदार मंडलिक यांनी विरोधात जावून पॅनेल करुन निवडणुक लढवली. या पॅनेलमधून आपण, खासदार मंडलिक, अर्जून आबिटकर असे तिघेजण निवडून आलो. याचे दुखः बऱयाच लोकांना सहन झाले नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून गटविभाजनाचा डाव आखण्यात आला. हा गट विभागावा म्हणून एकाही सभासदाची मागणी नव्हती. तरीही विभागणी करण्यात आली. पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या गटाची विभागणी करण्यात आली नव्हती. मात्र आत्तामध्येच हा गट का विभागण्यात आला हे सभासदांच्या समोर आले असल्याचेही संचालक पाटील यांनी सांगितले.