जेष्ठ वकील किसन येळ्ळूरकर यांचे निधन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमासत्याग्रही, रयत संघटनेचे नेते आणि बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, चव्हाट गल्ली येथील रहिवासी ऍड. किसनराव सिद्राय येळ्ळूरकर (वय 86) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सीमाभागाचे तसेच मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
किसनराव येळ्ळूरकर यांनी सीमाप्रश्नासाठी आपले योगदान दिले होते. त्यांनी सीमाप्रश्नाच्या लढय़ामध्ये शिक्षाही भोगली होती. शेतकऱयांच्या कल्याणासाठी त्यांनी रयत संघटनेमध्ये प्रवेश केला. शेतकऱयांच्या समस्या घेऊन अनेक आंदोलने केली. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. याचबरोबर राज्य मराठा परिषदचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही कार्यरत होते.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली होती. मराठा समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. मराठा समाजाचे एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी एका खासगी इस्पितळामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. चव्हाट गल्ली स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मंडळी अंत्यविधीवेळी उपस्थित होती. माजी नगरसेवक ऍड. अमर येळ्ळूरकर यांचे ते वडील होत.