दसऱयाच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी खरेदीला उधाण
प्रतिनिधी/ बेळगाव
नवरात्री काळातील मुख्य दिवस असणारा तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा विजयादशमी अर्थात दसरा बुधवारी सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सर्वत्र उत्साहाचे चित्र दिसून येत आहे. बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने मागील शेकडो वर्षांपासून सीमोल्लंघन साजरे केले जाते. वाजत-गाजत पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढून ज्योती कॉलेजच्या मैदानावर सीमोल्लंघन उत्साहात होते. आजही ही परंपरा बेळगावमध्ये जपली जात आहे. त्याच पद्धतीने दसऱया दिवशी कॅम्पमध्ये भव्य मिरवणूक व देखावे सादर करून दसऱयाचा आनंद द्विगुणित केला जातो.
चैतन्यदायी नवरात्री पर्व सध्या अंतिम टप्प्यात आहे. या पर्वातील नववा दिवस अर्थात खंडेनवमी मंगळवारी भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरी झाली. या दिवशी पहाटेपासूनच घरोघरी शस्त्र पूजनाची लगबग सुरू झाली होती. वाहनधारकांनी वाहने धुवून त्यांचीही पूजा केली. घरी तसेच आस्थापने याठिकाणी शस्त्रपूजन पार पडले. महत्त्वाचा दिवस असलेला विजयादशमी उत्सव बुधवारी होत आहे. पारंपरिक पद्धतीने सिमोल्लंघन होणार आहे.
बाजारात खरेदीसाठी तोबा गर्दी
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱया विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. विशेषतः पूजा साहित्याबरोबर सोने, आभूषणे, कपडे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाई आदीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षानंतर बाजारपेठ बहरताना दिसून आली.
कोरोनाच्या संकटानंतर यंदा दसरोत्सव निर्बंधमुक्त होत आहे. त्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसत आहे. बाजारात पूजा साहित्याबरोबर कपडे, मिठाई, झेंडूची फुले, ऊस आदी वस्तु खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झालेली पहायला मिळाली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक शोरूम, कपडय़ाची दुकाने आणि वाहनांच्या शोरूममध्ये रेलचेल दिसून आली.
दसऱयाच्या पूर्वसंध्येला बाजारात हार, फुले, आंबोती, केळीची पाने, आपटय़ाची पाने, नारळ, पानविडा, आगरबत्ती, लिंबू, कापूर, धूप आदी पूजा साहित्याबरोबर किराणा वस्तुंना मागणी वाढली होती. विशेषतः दसऱयादिवशी झेंडू आणि आपटय़ाच्या पानांना महत्व दिले जाते. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी झेंडुंच्या फुलांची विक्री झाल्याचे दिसून आले.
बाजारपेठेतील गणपतगल्ली, खडेबाजार, मारूती गल्ली, रामदेव गल्ली, पांगुळगल्ली, मेणसे गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, काकतीवेस आदि भागात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ पहायला मिळाली. त्याबरोबर दसरा हा नवीन खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे नवीन वस्तु, वाहने, सोने खरेदीला ऊत आला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सण उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा सण उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे उलाढालही वाढताना दिसत आहे.
झेंडुच्या फुलांची विक्री अधिक
खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन आणि वाहन सजावटीसाठी मंगळवारी मोठय़ा प्रमाणात झेंडुच्या फुलांची विक्री झाली. त्यामुळे बाजारात रंगी बेरंगी विविध जातीच्या फुलांची आवक वाढली होती. झेंडुंच्या फुलांची आकर्षक सजावट केली जाते. त्यामुळे झेंडुंच्या फुलांना विशेष मागणी होती.
उसाचीही विक्री वाढली
खंडेनवमी दिवशी म्हणजे मंगळवारी शहरात उसाची अधिक विक्री झाली. शहराबरोबर शहराबाहेरील रस्त्यावर ठिकठिकाणी उसाची विक्री करण्यात आली. हिंडलगा, विनायक मंदिर, पी. बी. रोड, आंबेडकर रोड, काकतीवेस रोड, सम्राट अशोक चौक, आदि ठिकाणी उसाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. खंडेनवमीला शस्त्र आणि वाहनांना ऊस बांधून पूजा केली जाते. त्यामुळे ऊसाची मागणी वाढली होती.
दसऱयाच्या पार्श्वभूमीवर अशोकनगर येथील फुलमार्केटमध्येदेखील झेंडुंच्या फुलांची आवक वाढली होती. त्यामुळे मार्केटमध्ये विविध रंगांच्या झेंडुंच्या फुलांच्या छटा पहायला मिळाल्या. त्याबरोबर झेंडुंच्या फुलांची विक्रीही अधिक प्रमाणात झाली.