सरकारची माहिती : 42 कंपन्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठी प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (पीएलआय) अंतर्गत 28 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह (एमएसएमइ) 42 कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी 17 कंपन्यांनी डिझाईन आधारित उत्पादनांसाठी एक टक्का अतिरिक्त प्रोत्साहनासाठी अर्ज केलेले आहेत. मंत्रालयाने दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठी पीएलआय योजनेअंतर्गत 28एमएसएमइएस यांच्यासह 42 कंपन्यांना मान्यता दिली आहे.
यामधील 42 कंपन्यांनी 4,115 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे 2.45 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त विक्री आणि त्याच योजनेच्या कालावधीत 44,000 हून अधिक अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
यादीमधील निवडक कंपन्या
यादीप्रमाणे पाहता कंपन्यांमध्ये फ्लेक्सट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीज (इंडिया), सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स, नोकिया सोल्युशन्स अँड नेटवर्क्स इंडिया, जबिल सर्किट्स इंडिया, डिक्सन इलेक्ट्रो अप्लायन्सेस, एचएफसीएल लिमिटेड, आयटीआय लिमिटेड, तेजस नेटवर्क्स, रायझिंग स्टार्स हाय-टेक यांचा समावेश आहे. ‘देशांतर्गत आणि जागतिक उत्पादकांकडून मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद दूरसंचार उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचललेल्या ठोस पावलांवर दृढ विश्वास दर्शवतो,’ असेही सरकारच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.