क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे झालेल्या फेडरेशन चषक कुस्ती स्पर्धेत बस्तवाडच्या लक्ष्मी संजय पाटीलने स्वाती पाटील, स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगाव हिचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. या यशामुळे कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची कर्नाटक संघात निवड झाली आहे.
फेडरेशन चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात हल्याळ स्पोर्ट्स हॉस्टेलची मल्ल लक्ष्मी पाटीलने अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलची मल्ल स्वाती पाटीलचा 12-6 अशा गुणफरकाने पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. तिच्या कामगिरीची दखल घेऊन पुढील महिन्यात होणाऱया कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची कर्नाटक संघात निवड झाली आहे. तिला हल्याळ स्पोर्ट्स हॉस्टेलचे कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे मार्गदर्शन तर वडील संजय पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.