कॅनरा बँकेचा उपक्रम, आजवर 20 हजार युवकांनी सुरू केला स्वयंरोजगार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना कॅनरा बँकेचे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र आशास्थान आहे. आजवर या प्रशिक्षण केंद्रातून जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांनी प्रशिक्षण घेतले असून, स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. केवळ प्रशिक्षणच नाहीतर राहण्याची व जेवणाची मोफत सोय या ठिकाणी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील गरजु व होतकरू युवक प्रशिक्षण घेत आहेत. यामुळे नव्या पिढीला आपल्या पायावर उभे करण्यासाठी ही प्रशिक्षण संस्था महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
प्रारंभी सिंडिकेट बँकेने हा उपक्रम सुरू केला होता. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्याने हे प्रशिक्षण केंद्र सुरू असून, यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते. 2 ऑक्टोबर 2000 साली मारुती गल्ली येथील कार्यालयात प्रशिक्षणाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑटोनगर येथील 1 एकर जागेत प्रशिक्षण संस्था उभी राहिली. शांत व स्वच्छ जागी प्रशिक्षण घेणेही सोयीचे ठरू लागले. आतापर्यंत 19 हजार 401 उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले असून, त्यापैकी अनेकांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे.
महिन्याला दोन प्रकल्पांचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी बाहेरून तज्ञ बोलावून उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातात. पुरूषांसाठी स्वतंत्र वसतिगृह व महिलांसाठी स्वतंत्र वसतिगृह असून जेवणाची मोफत सोय केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना येथून प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहता येत आहे.
या प्रकल्पांचे मिळते प्रशिक्षण
कॅनरा बँक प्रशिक्षण केंद्रातर्फे 67 हून अधिक प्रकारच्या प्रकल्पांचे प्रशिक्षण दिले जाते. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, कृषी उद्योग, कृत्रिम अळंबी निर्मिती, बेकरी उत्पादने, अग्नि व्यवस्थापन, घरगुती उत्पादने, नर्सरी व्यवस्थापन, फास्ट फुड, खेळणी, पेपर व कापडी बॅग तयार करणे, ब्युटी पार्लर, फोटो अॅन्ड व्हिडीओग्राफी, दुचारी रिपेअर्स,
इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर्स, मोबाईल रिपेअर्स, टेलरींग, मोटार रिवायडींग, डीटीपी, टॅली, एसी व टीव्ही रिपेअर्स यासह इतर प्रशिक्षण या केंद्राद्वारे मोफत दिले जाते.
तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण
प्रारंभी मारुती गल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर ऑटोनगर येथे विस्तृत जागेत प्रशिक्षण देण्यात येवु लागले. या ठिकाणी उमेदवारांना जितके दिवस प्रशिक्षण आहे तितके दिवस मोफत प्रशिक्षण व राहण्या, जेवण्याची सोय केली जाते. तसेच त्यांच्या स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहकार्य देखील करण्यात येते.
-सिद्दनगौडा (संचालक -कॅनरा बँक ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र)