प्रतिनिधी /वास्को
झुआरीनगर येथील एम. ई. एस. महाविद्यालयातर्फे एम. ई. एस. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने ‘कॉर्पोरेट जगतात रोजगार भरतीत नवोदितांना भेडसावणारी आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मनस्वी कामत, एम. ई. एस. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ऍन्थनी गोम्स, कार्यक्रम समन्वयक डॉ. चंपा परब, प्रमुख वक्त्या संचिता शिरोडकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रारंभी, प्राचार्य कामत यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याच्या संघटनेच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले. संघटनेचे अध्यक्ष श्री. गोम्स यांनी असोसिएशनच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रमुख वक्त्या संचिता शिरोडकर यांनी नोकरीसाठी पदवीधरांकडे असलेली कौशल्ये अधोरेखित केली. त्यांनी यावेळी एचआर व्यवस्थापक म्हणून त्यांच्या वैयक्तिक अनुभवाविषयी माहिती दिली.
या सत्रात महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून 171 जण सहभागी झाले होते. डॉ. चंपा परब यांनी आभार मानले.