-फेसबुक, व्हॉटसऍपवर इच्छुकांची झलक
-तंत्रस्नेही सदस्यांकडे वॉररूमचा ताबा
अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Kolhapur News: शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळासाठी मतदान 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांकडून इच्छुकांचे मुलाखती सत्र सुरू आहे. तरीही इच्छुक उमेदवार निवडून येण्यासाठी स्वतंत्रपणे अटोकाट प्रयत्नशील आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मिडीयावरून विद्यापीठ निवडणूकीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक संघटनेने तंत्रस्नेही सदस्यांकडे वॉररूमची जबाबदारी दिली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानातील बदलत्या काळानुसार यंदा विद्यापीठ निवडणुकीमध्ये सोशल मिडीयाचा पूर्णपणे वापर विविध संघटनांनी केला आहे. पुर्वी विद्यापीठ निवडणुक म्हंटले की, तीन जिल्हय़ात फिरावे लागत होते, पोस्टातून पत्र, निवडणूक यादी, उमेदवार यादी सदस्यांना द्यायला तीन ते चार दिवसाचा कालावधी लागत होता. आता मात्र व्हॉटसऍप, इन्स्टाग्राम, टय़ूटर, फेसबुक ग्रुपमुळे प्रचार करणे अतिशय सोपे झाले आहे. सध्या सर्वच संघटनांनी आपआपला व्हॉटसऍप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर रात्रं-दिवस निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे.
इच्छुकांच्या मुलाखती घेवून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या आर्थाने उघडपणे प्रचाराला सुरूवात होणार आहे. असे असले तरी इच्छुकांनी सध्या मतांची जुळवा-जुळव केली आहे. काहींनी तर आपला उमेदवारी अर्ज अपक्ष भरून सोशल मिडीयावर फोटोही व्हायरल केला आहे. तसेच विद्यापीठ विकास आघाडीची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.
विद्यापीठ विकास आघाडीमध्ये संस्थाचालक, प्राचार्यांचा समावेश असल्याने त्यांच्या गटातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. संस्थाचालकांचा दबाव प्राध्यापक, पदवीधर, प्राचार्य यांच्यासह इतर घटकांवरही असतो. त्यामुळे विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असे मानले जाते. परंतू आतापर्यंत सिनेट शिक्षक आणि विद्या परिषदेवर सुटाचे वर्चस्व कायम आहे. यंदा मात्र सुटाने विद्यापीठ विकास आघाडीला शिक्षक आणि विद्यापरिषदेच्या जागा सोडून अन्य जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर विकास आघाडीच्या कोअर कमिटीनेही चर्चा करण्यास होकार दिला आहे. परंतू या घडामोडीसंदर्भातही सोशल मिडीयावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. याला उत्तरही सोशल मिडीयावरूनच दिले जात आहे.
अधिक वाचण्यासाठी- World Architecture Day Special : पन्हाळा म्हणजे पुरातत्व शास्त्रा समोरचे आव्हान…
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली समविचारी विद्यार्थी संघटनांनी पदवीधर निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे. आपल्या संघटनेच्या दहाच्या दहा जागा निवडून आणण्यासाठी सोशल मिडियावरून जोरात प्रचार सुरू आहे. सर्वच तंत्रस्नेही विद्यार्थी असल्याने त्यांच्या प्रचाराचे मुख्य माध्यमच सोशल मिडीया ठरले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराची जागा आता सोशल मिडीयाने घेतल्याचे स्पष्ट झाले असून, यातून उमेदवाराचा वेळ, कष्ट आणि पैसाही वाचला आहे.
सर्वच संघटना झाल्या तंत्रस्नेव्ही
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हय़ातील शिक्षक, पदवीधर, प्राचार्य, विभागप्रमुख, संस्थाचालकांच्या बैठका झाल्या. या बैठकांमधून इच्छुकांची नावे पुढे आली असून विद्यापीठ विकास आघाडी मुलाखतीनंतर उमेदवारी जाहीर करेल. असे असले तरी इच्छुकांकडून व्हॉटसऍपवरून प्रचार सुरूच आहे. तर सुटाने उमेदवारी निश्चित करून प्रत्यक्ष व सोशल मिडीयावरून प्रचाराला सुरूवात केली आहे. शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीनेही नावनोंदणी केलेल्या मतदारांचा वेगळा ग्रुप करून प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक इच्छुक स्वतःपुरते मत मागत आहेत, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर उमेदवारांनी दिली आहे.