निवृत्त उपाधिक्षक दिनकर मोहिते यांचाही सन्मान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान
प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह तत्कालीन पोलीस निरीक्षक व निवृत्त उपाधिक्षक दिनकर मोहिते यांना गुरुवारी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे पार पडलेल्या समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या पदकांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.
पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांना 2020 च्या स्वातंत्र्य दिनी तसेच 2021 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या पोलीस पदकांचे गुरुवारी वितरण झाले. यावेळी राज्यातील 114 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. या समारंभाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत 1994-95 मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. त्यांनी नाशिक, मुंबई, जळगाव, पुणे व कोल्हापूर याठिकाणी सेवा बजावली आहे. 3 जानेवारी 2018 रोजी कोल्हापुरात भीमा कोरेगाव प्रकरणानंतर निर्माण झालेली तणावपुर्ण परिस्थीती उत्कृष्टरित्या हाताळली. राजस्थान येथील कुख्यात बिश्नोई गँगला किणी टोल नाक्यावर रोखताना झालेल्या गोळीबारादरम्यान सावंत यांनी जीव धोक्यात घालून सहकाऱ्यांचे प्राण वाचविले. या गुंडांवर त्यांनी सहा गोळ्या झाडल्या व त्यांना जेरबंद केले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 400 बक्षिसे मिळाली आहेत. 32 गुंडांच्या टोळ्यांना मोका लावला आहे. 2010 मध्ये उत्कृष्ट अधिकारी तसेच 2012 मध्ये पोलीस महासंचालक पदकाने सावंत यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ठाणे येथे पोलीस उपअधिक्षक पदावर कार्यरत असताना दिनकर मोहिते यांनी दोन वर्षात मुंबईसह परिसरात केलेल्या कामगिरीची दखल घेत हे पदक जाहिर करण्यात आले आहे. यावेळी पोलीस दलाच्या कार्यकाळात दिनकर मोहिते यांनी अनेक क्लिष्ट आणि जटिल तपास करुन अंडरवर्ल्ड पासून ते कोल्हापूरच्या नामचीन गुंडापर्यंत जरब निर्माण केली होती. पोलीस दलात ठाणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर ते निवृत्त झाले.
पुरस्कार आईला समर्पित
आई, वडील, मोठे भाऊ यांच्या शिकवणीमुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पोलीस दलातील 28 वर्षाच्या सेवेमध्ये समर्पक भावनेने काम केले. आज मिळालेला हा पुरस्कार आईच्या चरणी समर्पित करतो अशी भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सवांत यांनी व्यक्त केली.