Tarun Bharat

महाव्दार रोडच्या रेशीम गाठी आणखी झाल्या घट्ट

महाव्दार रोडवरील जेष्ठ रहिवाशांचा होणार गौरव

सुधाकर काशीद/कोल्हापूर

महाद्वार रोड म्हणजे कोल्हापूरचे हृदयच. कोल्हापूरच्या प्रत्येकाचे महाद्वार रोडशी या ना त्या कारणाने नाते जोडले गेलेले. अंबाबाईचं दर्शन म्हटले की महाद्वार रोड आलाच. नवी फॅशन आणि शायनिंग म्हटलं तर ते महाद्वार रोडवरच. प्रत्येक मिरवणूक जाणार ती महाद्वार रोड वरूनच. खाण्याचे विविध प्रकार महाद्वारलाच. आणि नगर रचनेनुसार कोल्हापूरचा अधिकृत मध्यबिंदूही महाद्वार रोडलाच अशा या महाद्वार रोडवर खूप मोठय़ा मोठय़ा लोकांनी त्या काळात वास्तव्य केलं. खूप जणांनी पिढ्य़ानपिढ्य़ा आपला व्यवसाय वाढवला. महाद्वार रोडवर अशाच पिढ्य़ानपिढ्य़ा असलेल्या काही व्यक्तींचा गौरव करण्याची प्रथा आता तेथील रहिवाशांनी, व्यापाऱ्यांनी चालू केली आहे कोल्हापुरात नक्कीच त्यानिमित्ताने जुन्या नात्यांचे रेशीम बंध घट्ट होऊ लागले आहेत.

महाद्वार रोड म्हणजे जोशी रावांचा गणपती (बिनखांबी) ते पापाची तिकटी असा अघळपघळ रस्ता. अंबाबाईच्या मंदिरामुळे सर्वांना अधिक जवळचा झालेला. देवळाच्या पिछाडीला कडेकरांचा वाडा. व त्याच्या शेजारी जोशी यांच्या वाडय़ात बापू वाईकर यांचा हॉटेल होतं. तळहाताएवढा वडा आणि हातात मावणार नाही इतका मोठा बुंदीचा लाडू हे या हॉटेलचे वैशिष्ट्य़. वडा आणि बुंदीच्या लाडवावर ताव मारण्यासाठी संध्याकाळी या हॉटेलात झुंबड उडालेली असायची.

वाईकर यांच्या हॉटेल समोर पाठकांचा फोटो स्टुडिओ होता. 1935 साली स्थापन झालेल्या या स्टुडिओचा आव काही वेगळाच होता. या स्टुडिओच्या प्रवेशद्वाराला वाडी रत्नागिरी येथील जोतिबाच्या मूळ उभ्या रूपातील मूर्तीचे छायाचित्र होते. जोतिबाची पूजा कायम बैठ्य़ा स्वरुपात बांधली जात असल्यामुळे जोतिबाची मूर्ती ही बैठ्य़ा स्वरूपातच आहे असा बहुतेक भाविकांचा समज आहे. पण प्रत्यक्षात जोतिबाची मूळ मूर्ती उभ्या स्वरूपात आहे हे पाठकांच्या स्टुडिओमध्ये लावलेल्या फोटोवरुन अनेकांना कळत होते. आणि लोक थांबून या छायाचित्राचे दर्शन घेत होते.

महाव्दार रोडचं कामत हॉटेल म्हणजे कोल्हापूरकरांचे आंबोळी खाण्याचं प्रसिद्ध ठिकाण होतं. त्यावेळी आंबोळी खाणे म्हणजे लय भारी असे वाटण्या सारखेच वातावरण होते. त्याच्या समोरच तृषा शांती हे आईक्रीमचे दुकान आपलं वेगळं अस्तित्व टिकवून होतं. आजही शंभर वर्ष झाली हे दुकान थंडगार सेवा देत सुरू आहे. त्याच्या शेजारी शुक्लांचा वाडा आहे. या शुक्लांच्या वाडय़ात कात्यायनीची विहीर आहे. ज्या काळात कोल्हापूरला पाणीपुरवठय़ाची योजना नव्हती त्यावेळी कात्यायणी डोंगराच्या झऱयातून पाणी कोल्हापुरात नळावाटे आणले गेले होते. व या ठिकाणी असलेल्या विहिरीत साठवून त्याचा वापर केला जात होता. त्यातली एक विहीर आजही शुक्लांच्या वाडय़ात आहे. महाद्वार रोडवर ही प्राचिन इतिहास असलेली पाझर असलेली विहीर आहे हे फार क्वचितच लोकांना आज माहिती आहे.

या शुक्लांच्या वाड्य़ा शेजारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे माजी सल्लागार शुक्ला यांचे घर आहे. त्यांच्या शेजारी पंचांग करते लाटकर व त्यांच्या शेजारी रँगलर नारळीकर देशाचे भूषण असलेले शास्रज्ञ जयंत नारळीकर यांचे घर आहे. त्या काळी लग्न, वास्तुशांती, जावळ बारसे याचे मुहूर्त लाटकरांच्या पंचागावर अवलंबून होते अनेकांच्या कुंडल्या लाटकरांच्याकडेच तयार झाल्या. रँगलर नारळीकर व त्यांचे चिरंजीव जयंत नारळीकरांनी विद्या बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उंचावले. दुधगावकर, उमराणीकर कुलकर्णी दुधगावकर, जोशी राव, वामनाचार्य, हसबनीस यांची निवासस्थाने याच महाद्वार रोडवर एका रांगेत उभी होती.

महाद्वार रस्त्याला अंबाबाईच्या देवळासमोर दोन फाटे फुटतात. एक फाटा रंका ळ्याकडे व दुसरा अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराकडे जातो. या महाद्वाराकडे गेलेल्या रस्त्याच्या तोंडाला दगडू बाळा भोसले यांचे पेढय़ाचे दुकान आहे. पेढय़ावर चक्क त्यांच्या नावाचा शिक्का उठवण्याची पद्धत आजही आहे. बरोबर त्याच्यासमोर कोल्हापुरी संगीत चिवडा या नावाचे दुकान आहे. हा चिवडा व संगीत याचा नसा काही संबध नाही. कोल्हापुरी संगीत चिवडा या नावात खूप कुतूहल आहे. ब्राह्मणाचे फराळाचे दुकान गोविंद विनायक मराठे संगीत चिवडा अशी त्याची जुनी ओळख आहे.

या संगीत चिवड्य़ाच्या दुकानासमोर सांगवडेकर यांचे पुस्तकाचं दुकान आहे. जुनी पुस्तके दयायची व थोडी रक्कम भरून नवी पुस्तके या दुकानात मिळायची. त्यामुळे या दुकानात गरीब व मध्यम वर्गीयांची कायम झुंबड असायची. 1921 साली या दुकानाची स्थापना झाली या दुकानांने अनेकांच्या शिक्षणाला हातभार लावला. त्याच्यापुढे 1936 ला स्थापन झालेले महाराष्ट्र ग्रंथ भांडार आहे. हे दुकान म्हणजे धार्मिक आध्यात्मिक व दुर्मिळ पुस्तकांचा खजिनाच आहे. त्याच्या समोरच त्यावेळेची जयंत मेडिकल, झुरळे यांचा पहिले औषधाचे दुकान. त्याच्या शेजारीच सासने यांचे गॅस बत्तीचे दुकान आहे. त्या गॅसबतीच्या प्रकाशातच बालगंधर्वाच्या नाटकाच्या मैफिली कोल्हापुरात पहाटेपर्यंत रंगल्या. त्याच्याशेजारीच गोखले रानडे यांचे कापडाचे दुकान आणि सराफी पेढी आहे.

महाव्दार रोड म्हणजे अशा वैविध्याचा खजिनाच आहे. राजोपाध्ये बोळाच्या तोंडाला मन्याबापू पडळकर याचे टिपीकल कोकणी हॉटेल आहे. कमल हसन याने ज्यांच्याकडे नृत्यकलेचे शिक्षण घेतले ते प्रकाश नृत्य कला मंदिर महाव्दार वरचआहे. कोल्हापुरातले पहिले पोलीस ठाणे जेथे होते तो निबांळकर यांचा वाडा महाव्दार लगतच गुजरीत आहे. कोल्हापुरात पहिल्यांदा टय़ुब लाईटचा प्रकाश महाव्दार रोडवरच खोंद्रे याच्या पानपट्टीच्या दुकानात झळकला. त्या काळात टय़ुब लाईट हा देखील आकर्षणाचा भाग होता. बहिरशेठ, कटके या बंधुनी अत्तराचा घमघमाट गेली 100 वर्षे महाव्दार रोडवर दरवळत ठेवला.
महाव्दार रोड कायम कोल्हापूरकरांशी नाते जोडुन राहिला. नवे कपडे घातले की महाव्दार रोडवरून दोन फेऱ्या मारायच्या. शायनिंग करायचे हा प्रघातच होता. नजरा नजरेतुन प्रेम कसे जुळते याचा साक्षिदार महाव्दार रोडच ठरला. अशा या महाव्दार रोडवरचे रहिवाशी आता पुन्हा नव्या जाणिवेने एकत्र आले आहेत. रोडवर रहाणाऱ्या जेष्ठांचा गौरव ते करत आहेत.

वॉर्डाची सुरवात महाव्हार वरच
शहरात एबीसीडी हे चार वॉर्ड आहेत. याचार वॉर्डाची सुरवात महाव्हार वरच आहे. त्यामुळे ए एक, बी एक, सी एक व डी एक या नंबरची घरे महाव्दार वरच आहेत.

Related Stories

बेजबाबदार नागरिकांवर कारवाईसाठी पालिकाही रस्त्यावर

Archana Banage

सदावर्ते यांचा अडचणींचा वनवास संपता संपेना, आता ‘हे’ पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता

Archana Banage

संभाजीराजे काढणार शिवशाहू यात्रा !

Archana Banage

हृदयद्रावक! 9 महिन्यांच्या चिमुरड्याचा पीठात गुदमरुन मृत्यू,कोल्हापुरातील घटना

Archana Banage

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास A+ नामांकन

Archana Banage

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावर ट्रक-दुचाकीचा अपघात

Archana Banage