निफ्टी 34 अंकांनी नुकसानीत : अदानींचे समभाग घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मंगळवारी दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 40 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. या अगोदरच्या दिवशी म्हणजे सोमवारी मात्र बाजार तेजीसोबत बंद झाल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु ही तेजी कायम ठेवण्यात दुसऱ्या सत्रात बाजाराला अपयश आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने भारतीय बाजारात मंगळवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 40.14 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 57,613.72 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 34 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 16,951.70 वर बंद झाला आहे.
मुख्य समभागांपैकी सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग घसरणीत तर 11 समभाग हे तेजीत राहिल्याची नोंद झाली. मंगळवारी अदानी समूहातील सर्व म्हणजे 10 समभाग नुकसानीत राहिले होते. समूहातील फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसचे समभाग 6.97 टक्क्यांनी घसरले, तर अदानी ट्रान्समिशन, पोर्ट्स, विल्मर, पॉवर, टोटल गॅस व ग्रीन एनर्जी यांचे समभाग हे 5 ते 5 टक्क्यांनी घसरले.
जागतिक बाजाराची स्थिती
जागतिक पातळीवर बाजारामधून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. यामध्ये बँक व एनर्जी यांच्या समभागांच्या मदतीने सोमवारी अमेरिकेत तेजी दिसून आली. डाऊ जोन्स जवळपास 200 अंकांनी वधारला होता. मात्र नॅस्डॅक हा अर्धा टक्क्यांनी खाली आला होता. आशियातील बाजाराचा माहौल मात्र सकारात्मक राहिला होता.
एफआयआयमधील विक्री सुरुच
विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांकडून सलग केलेल्या विक्रीचा प्रवास कायम दिसून आला. यामध्ये सोमवारी एफआयआय बाजारात रोख 891 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री झाली. देशातील संस्थांकडून गुंतवणूकदारांनी एकूण 1809 कोटी रुपयाच्या समभागांची खरेदी केली आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत एफआयआयने एकूण 1,137 कोटी रुपयाची विक्री केली.