निफ्टीने ओलांडली 18 हजाराची पातळी ः ऑटो निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक वातावरणात भारतीय शेअर बाजारही सोमवारी चांगल्या मूडमध्ये दिसून आला. निफ्टीने 18 हजाराचा टप्पा ओलांडलाच पण सेन्सेक्सने 786 अंकांनी वधारत तेजोमय वाटचाल चालू ठेवली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 786 अंकांच्या वाढीसह 60,746.59 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 225 अंकांच्या तेजीसह 18,012.20 अंकांवर बंद झाला. सोमवारी भारतीय शेअरबाजारात सुरुवातच सकाळी दोन्ही निर्देशांकांनी तेजीसह केली. जागतिक सकारात्मक वातावरण व नित्य होणारी विदेशी गुंतवणूक या पार्श्वभूमीवर शेअरबाजार सोमवारी फॉर्मात होता. एकावेळी इंट्रा डे दरम्यान मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स 700 अंकांच्या तेजीसह 60695 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 150 अंकांच्या वधारासह 17950 अंकांवर पोहोचला होता. निफ्टी निर्देशांकात आयटी व ऑटो निर्देशांक 1 टक्के वाढला होता.
धातू, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक मात्र घसरणीत व्यवहार करत होता. फार्मा निर्देशांकसुद्धा 1 टक्का वाढला होता. बंधन बँकेचा समभाग 10 टक्के घसरत 244 रुपयांवर खाली आला होता. शुक्रवारी अमेरिकेतील बाजार बऱयापैकी वधारत बंद झाले होते. याचा लाभ भारतीय बाजारालाही झाला. डॉ. रेड्डीज लॅब 1 टक्का, जेएसडब्ल्यू एनर्जी 2 टक्के वाढताना दिसला. जेएसडब्ल्यू एनर्जीने दुसऱया तिमाहीत 37 टक्के वाढीसह 466 कोटींचा नफा पदरात पाडून घेतला आहे. बँकिंग क्षेत्रात एचडीएफसी बँक, एयु स्मॉल फायनान्स बँक, कोटक महिंद्रा बँक लाभात होते. फार्मा क्षेत्रात डॉ. रेड्डीजसह अरोबिंदो फार्मा, डिव्हीस लॅब्ज यांचे समभाग तेजीत होते.
जागतिक बाजारही तेजीत
जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजार तेजी राखून होते. युरोपियन बाजारात मात्र मिळताजुळता कल होता. आशियाई बाजाराने तेजी राखण्याचा प्रयत्न केला होता.