जागतिक बाजारात नरमाईचा कल ः सेन्सेक्स 54 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी बीएसई सेन्सेक्स चढउताराच्या प्रवासात तेजीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स दिवसअखेर जवळपास 54.13 अंकांची तेजी प्राप्त करत बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये जागतिक बाजारात नरमाईचा कल राहिला होता. याचाही प्रभाव देशातील बाजारावर झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी देशातील बाजारात बीएसई सेन्सेक्स 54.13 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,085.43 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 27.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,604.95 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये मुख्य समभागांमध्ये इंडसइंड बँक, एनटीपीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, टीसीएस, टायटन, सनफार्मा आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय कम्पोझिट, जपानचा निक्की आणि हाँगकाँग नुकसानीत राहिले. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी लाभासह बंद झाले आहेत. युरोपमध्ये बाजारांमध्ये सुरुवातीला घसरणीचा कल राहिला.
देशातील बाजारात तडजोड आणि स्पर्धात्मक स्थितीमुळे जागतिक बाजारात नरमाईचा कल राहिला आहे. यामुळे काहीसे दबावाचे वातावरण राहिले होते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत काहीशी स्थिती चांगली दिसत नाही आहे. सेवा क्षेत्राची कामगिरी नकारात्मक राहिली आहे. तर युरोपमध्ये तेल संकट व वृद्धीमधील अनिश्चितता राहिल्याने बाजारात विक्रीचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.04 टक्क्यांनी वधारुन 101.3 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.