ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान व वाहन क्षेत्राने बाजाराला सावरले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी प्रारंभीच्या घसरणीमधून सावरत हलक्या तेजीसोबत बाजार बंद झाला आहे. यामध्ये जागतिक बाजारातील तेजी येण्याच्या कारणास्तव अंतिमक्षणी ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान व वाहन या क्षेत्रातील समभागांच्या लिलावामुळे बाजारात उत्साह राहिल्याचे दिसून आले.
दिवसभरातील प्रमुख घडामोडींमुळे बीएसई सेन्सेक्स 16.17 अंकांनी म्हणजे 0.03 टक्क्यांनी सावरत 53,177.45 निर्देशांक बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 18.15 अंकांनी वधारत निर्देशांक 15,850.20 वर बंद झाल्याचे दिसून आले.
मंगळवारी बाजारात महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ.रेड्डीज लॅब, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टायटन, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारातील आशियातील जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे सुरुवातीच्या घसरणीतून सावरत तेजीत राहिले. तर युरोपमधील प्रमुख बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.58 टक्क्यांनी वधारुन 116.9 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
मंगळवारपासून 47 वी जीएसटी परिषद सुरु झाली आहे. ही बैठक 29 जूनपर्यंत चालणार आहे. यामध्ये ई कॉमर्स, ऑनलाईन गेमिंगसह अन्य घटकांवर वस्तू व सेवा कर लागू करणार का नाही, यासह अन्य बाबींविषयी स्पष्टता होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र यासोबतच या सर्व घडामोडीचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दरम्यान रुपयाने डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण नोंदवली होती.